तुम्ही आत्महत्या करण्याचा विचार करत आहात का?

Find Help Now
Language हिन्दी / ਪੰਜਾਬੀ / ગુજરાતી / മലയാളം / தமிழ் / English

तुमची समस्या तुमच्या सहनशक्तीच्या बाहेर गेली आहे का? तुम्हाला असहाय आणि आशाहीन वाटत आहे का? एका नवीन दिवसाचा सामना तुम्ही करू शकाल की नाही याची तुम्हाला खात्री वाटत नाही का? तर मग, येथे दिलेल्या संसाधनांची तुम्हाला नक्की मदत होईल:

जीवनाला तुम्ही आणखी एक संधी का दिली पाहिजे

तुम्ही हा लेख वाचत आहात कारण तुम्ही स्वतःचे जीवन संपवण्याचा विचार करत आहात. किंवा तुम्ही अशा व्यक्तीला ओळखता जी आपला जीवन संपवण्याचा विचार करत आहे.

जर तुम्ही ती व्यक्ती असाल ज्याने जीवनाची आशा गमावली असेल, तर कृपया पुढे वाचा. मला तुमच्याशी वैयक्तिक बोलू द्या. मला वाटते की तुम्ही तुमचे जीवन संपवण्याची योजना आधीच आखली असेल किंवा प्रयत्नही केला असेल. तुमचे जीवन किती आशाहीन आहे, तुमच्या जीवनात हे असे किती दिवस चालणार आहे याचाच कदाचित तुम्ही विचार करत असाल. हे दुःख अकल्पनीय आहे. तुमच्यावर किती मोठे ओझे आहे किंवा तुमच्या जीवनात जी भावनात्मक उलथापालथ होत आहे हे कोणीच समजू शकत नाही.

पण, आता तुम्ही येथे आहात म्हणून, मी तुम्हाला एक आशा देणार आहे, तुमच्या जीवनाला एक वेगळे वळण देऊ इच्छिता, तुमच्या जीवनाला आणखी एक संधी देऊ इच्छिता.

पर्याय: तुम्ही आपले जीवन संपवण्याऐवजी तुम्ही आणखी काहीतरी विचार करावे अशी विनंती मी तुम्हाला करत आहे. तुम्ही कदाचित समुपदेशन घेण्याचा किंवा कोणाशीतरी बोलायचा प्रयत्न केला असावा, पण त्याचा काहीच फायदा झाला नसावा. मी तुम्हाला पुन्हा एकदा काही पावले उचलण्याची विनंती करत आहे; अशी पावले ज्यांच्यामुळे, तुम्हाला एका वेगळ्या दिशेने वाटचाल करायला, आणि ज्यांचा तुम्हाला खूप त्रास झाला आहे, अशा नुकसानदायक विचारांपासून दूर जायला तुम्हाला मदत मिळेल.

तुम्ही कदाचित म्हणाल, “मी अपयशी का आहे, हे मला माहीत आहे. माझ्यावर कर्जाचे मोठे ओझे आहे. माझी पत्नी/पती मला सोडून गेले. जवळची व्यक्ती मरण पावली आहे. मी बेरोजगार आहे. मी एकटा/एकटी आहे. मी______ (रिकाम्या जागेत तुम्ही लिहा).” मला तुम्हाला सांगायचे आहे की, जरी तुम्ही अनेक समस्यांचा सामना करत आहात आणि जीवनात संघर्ष करत आहात, तरी या गोष्टींसोबतच कदाचित तुम्ही तुमच्या मज्जासंस्थेत उद्भवलेल्या काही रासायनिक तत्त्वांच्या कमतरतेशीदेखील संघर्ष करत आहात. तुमच्या नैराश्येच्या भावनांमागे कदाचित हे एक मोठे कारण असू शकते.

सर्वात आधी, तुम्हाला हे समजून घेण्याची गरज आहे की कोणत्या गोष्टींमुळे तुम्ही नैराश्याच्या भावनेने ग्रस्त आहात.

नैराश्याने ग्रस्त असलेल्या अनेक जणांना माहीतच नसते की मेंदूत काही रासायनिक द्रव्यांच्या (न्यूरोकेमिकल्स) कमतरतेमुळेदेखील नैराश्य येते. जगप्रसिद्ध Mayo Clinic च्या एका अलीकडच्या लेखात म्हटले होते की “तज्ज्ञांना वाटते की आनुवांशिकता आणि पर्यावरणीय तत्त्वांमुळे, जसे की तानतणाव किंवा शारीरिक आजारांमुळे न्यूरोट्रांसमिट्टर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेंदूतील रासायनिक द्रव्यांचे संतुलन बिघडू शकते आणि त्यामुळे नैराश्य येऊ शकते. असे दिसून येते, की नैराश्याचा संबंध सेरोटोनिन, नोरेपिनेफ्रिन आणि डोपामिन नावाच्या तीन न्यूरोट्रांसमिट्टर्समधील असंतुलनाशी आहे.”

या रासायनिक द्रव्यांमुळे लोकांना मन एकाग्र करायला, मनःस्थिती सुधारायला आणि शारीरिक उर्जा वाढवायला मदत होते. औषधांच्या मदतीने आणि व्यायाम आणि आध्यात्मिकता वाढवण्यासाठी वेळ काढणे यांसारख्या नैसर्गिक पद्धतींच्या मदतीने मेंदूतील हे रासायनिक द्रव्य वाढवण्यास मदत होते. यासोबतच तुम्हाला इतर समस्यांतूनही मार्ग काढणे गरजेचे आहे, जसे की मृत्यू किंवा घटस्फोटामुळे गमावलेल्या प्रिय व्यक्तीची कमतरता, कमी झालेला आत्म-सन्मान, दोषभावना, संताप, राग, किंवा गतकाळातील लैंगिक शोषण, वगैरे. या समस्यांवर प्रक्रिया करणे, त्यांचे निरसन करणे आणि त्यांच्याबद्दल दुःख व्यक्त करणे गरजेचे आहे.

तुम्ही समुपदेशनासाठी जात होता का, आणि नैराश्यावर उपचार घेत होता का? नसाल, तर मदत मिळवण्यासाठी लगेच तुमच्या डॉक्टरला किंवा एका मानसोपचार तज्ज्ञाला जाऊन भेटा किंवा तुमच्या जवळ असलेल्या आपत्कालीन मदत केंद्राला भेट द्या. तुम्ही राफाच्या हॉटलाईन क्रमांकावर फोन करू शकता आणि फोनवरून तुमच्या परिस्थितीबद्दल सांगू शकता आणि अमेरिकेत कोठेही 1-800-383-4673 या क्रमांकावर एका समुपदेशकाशी बोलू शकता. कॅनडाच्या आणि आंतरराष्ट्रीय हॉटलाईन क्रमांकांसाठी, कृपया या पृष्ठाच्या वरील बाजूस पाहा किंवा स्थानिक संसाधनांमध्ये फोन क्रमांक शोधा. हे लगेच करा!

जर सध्या तुमचे समुपदेशन सुरू असेल, तर तुमच्यावर उपचार करणाऱ्या व्यक्तीशी आणि/किंवा मानसोपचार तज्ज्ञाशी तुम्ही संपर्क करा, आणि स्वतःचे जीवन संपवण्याच्या विचारांच्या बाबतीत आणि स्वतःला नुकसान पोहचवण्याच्या योजनांच्या बाबतीत तुम्हाला मदत हवी आहे हे त्यांना सांगा. कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा तुमच्या एखाद्या मित्र-मैत्रिणीला तुमच्यासोबत यायला सांगा.

नैराश्याला समजून घेणे आणि तुमच्या भावनांना आव्हान करणे

तुमच्या भावनांवर आणि तुमच्या नैराश्यावर भरवसा करता येऊ शकत नाही. भावना या वस्तुनिष्ठ सत्ये नसतात. भावना या व्यक्तीनिष्ठपणे विचार करण्याचे संकेत असतात आणि तुमच्या मनातील ज्या विचारांमुळे तुम्ही स्वतःचे जीवन संपवण्याचा विचार करत होता त्यांचा तुम्ही शोध घेतला पाहिजे. स्वतःचा जीव घेण्याचा विचार करणे म्हणजे जीवनाबद्दलच्या आणि भविष्याबद्दलच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवणे. गतकाळात अनेक लोक नैराश्याच्या भावनांशी झुंजले होते, पण ते या विचारांना किंवा भावनांना बळी पडले नव्हते. त्यांच्याकडे जीवनात पुढे वाटचाल करत राहण्याची हिंमत होती, आपले भविष्य आणि आपले जीवन वेगळे असू शकते या गोष्टीवर भरवसा करण्याची हिंमत त्यांच्याकडे होती.

मार्टिन लूथर यांनी आपल्या मनःस्थितीमध्ये वारंवार खालच्या थरावर होणाऱ्या बदलांचे या शब्दांत वर्णन केले: “एक आठवड्यापेक्षा जास्त दिवसांपासून मी मृत्यूच्या आणि नरकाच्या दारात उभा होतो. मी पूर्णपणे, प्रत्येक अवयवात हादरून गेलो होतो. ख्रिस्त पूर्णपणे हरवला होता. हताशा आणि देवाची निंदा या गोष्टींमुळे मी हादरलो होतो.” (हिअर आय स्टँड, अबिंग्डन प्रेस)

पास्टर (चर्चचा मुख्य धर्मोपदेशक) आणि लेखक, डॉन बेकर यांनी त्यांना आलेल्या नैराश्याच्या अनुभवाबद्दल असे लिहिले: “मला वाटायचे की वास्तवाशी माझा काहीच संबंध नाही. जीवन माझ्यासाठी धूसर झाले होते, आणि कधीकधी वाटायचे की जीवन अस्तित्वातच नाही. मला माझे जीवन फक्त एक ढोंग असल्यासारखे आणि काल्पनिक गोष्ट वाटायची. कोणालाच माझी चिंता नाही, देवालासुद्धा नाही, असे मला वाटायचे. कधीकधी यावर मला फक्त एकच उपाय दिसायचा—आत्महत्या...”

हे पुरुष आपल्या नकारात्मक भावनांना बळी पडले नाहीत. त्यांनी नैराश्याच्या विचारांना नकार दिला आणि जीवनाच्या मार्गावर ते पुढे जात राहिले. ते अडथळ्यांवर आणि नैराश्याच्या भावनांवर मात करू शकले. तुम्हालादेखील तुमच्या नकारात्मक भावनांमुळे आणि विचारांमुळे जीवनापासून दूर जाण्याची गरज नाही.

अशा विचारांना आव्हान देण्याची हीच वेळ आहे. जीवनाकडे एका निरोगी दृष्टिकोनातून पाहण्याची ही वेळ आहे. तुम्ही एक मूल्यवान व्यक्ती आहात. तुमचे महत्त्व आहे आणि तुम्ही आपली विचारसरणी आणि वर्तणूक बदलू शकता आणि तुमच्या जीवनात सुधारणा करू शकता! मी तुम्हाला विनवणी करत आहे की तुमच्या जीवनात तुम्हाला एक आशा देण्यासाठी तुम्ही देवालादेखील एक संधी द्या. तुम्ही देवाकडे वळा आणि त्याच्या मदतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी त्याला विनंती करा. तो तुमच्यासाठी काय करू शकतो हे तुम्ही स्वतः का पाहत नाही? त्याने कितीतरी लोकांचे जीवन बदलले आहे, निराश लोकांना उभारी दिली आहे आणि जीवनात हार मानलेल्यांना आशा दिली आहे.

स्वतःला विचारा:

  1. माझ्या नैराश्याच्या भावनांमागे कोणती कारणे आहेत?
  2. आत्म-स्न्मान गमावल्याच्या भावनांनी मी ग्रस्त आहे का?
  3. माझ्यामध्ये दोषभावनेच्या समस्या आहेत का?
  4. मी नातेसंबंधांच्या समस्यांशी संघर्ष करत आहे का?
  5. मला कोणत्यातरी गोष्टीची भीती वाटत आहे का?
  6. काहीतरी गमावल्याच्या भावनांशी मी संघर्ष करत आहे का?
  7. माझ्या मनात कोणत्या प्रकारचे विचार सतत येत असतात?
  8. देवाला शोधण्याच्य़ा बाबतीत मी एक पाऊल पुढे कसे टाकू शकतो?

या गोष्टी तुम्हाला प्रकट करण्यासाठी तुम्ही देवाला विनंती करा. मग, देवाला प्रार्थना करण्याद्वारे तुमचे जीवन पूर्णपणे बदलून टाकण्याची त्याला विनंती करा. हार मानू नका! संघर्ष करण्याचे सोडू नका! आपले जीवन न संपवण्याबद्दल तुमच्या अगदी जवळच्या एखाद्या व्यक्तीशी आताच करार करा.

आशाहीनतेच्या पलीकडे जाणे

साधारणत:, ज्या गोष्टी केल्याने नैराश्याने ग्रस्त लोकांना बरे वाटू शकते त्या गोष्टी सहसा ते करत नाहीत. तुम्हाला नैराश्याच्या भावनांशी झुंज द्यायची आहे आणि जीवनात पुढे जायचे आहे. म्हणून तुमच्या भावनांबद्दल, जीवनाबद्दल कोणाशीतरी बोला. तुम्हाला कसे वाटते त्याबद्दल कोणाशीतरी बोलणे फायदेकारक आहे. तुमच्या भावनांमागे कोणत्या गोष्टी आहेत याचा शोध घेतल्याने, विशेषकरून तुमच्या समुपदेशकासोबत मिळून शोध घेतल्याने तुम्हाला तुमच्या समस्येवर उपाय शोधण्यास मदत मिळू शकते.

तुमच्या डॉक्टरकडे जाऊन शारीरिक तपासणी केल्याने आणि डॉक्टरला तुमच्या नैराश्याबद्दल सांगितल्याने शारीरिक आजारांवर उपचार करण्यास मदत होऊ शकते. तुम्हाला कदाचित नैराश्याच्या उपचाराचे औषध घ्यावे लागू शकते. नियमितपणे व्यायाम करणे आणि योग्य पौष्टिक आहार घेणेदेखील फायदेकारक ठरू शकते आणि जर मेंदूतील रासायनिक द्रव्यांमध्ये (न्यूरोकेमिकल्स) असंतुलन निर्माण झालेले असल्यास त्यांच्यामध्ये संतुलन निर्माण करण्यास या गोष्टींमुळे मदत मिळू शकते.

तुमची काळजी करणाऱ्या लोकांसोबत, जसे की मित्र-मैत्रिणी, देव, तुमच्या कुटुंबातील सदस्य आणि चर्चच्या लोकांसोबत वेळ घालवल्याने इतरांशी जुळून असल्याची भावना तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला जीवनाचा अर्थ कळू शकतो.

सुरुवात कोठे करावे: तुम्ही हा लेख वाचलेला आहे. आता तुम्ही जीवनाकडे एक पाऊल टाकण्याचा विचार कराल का? आपल्या जीवनाचे पुनर्गठन करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकाल का? इतरांची मदत मिळवण्याच्या उद्देशाने एक पाऊल पुढे टाकाल का? तुम्ही स्वतःला ज्या खोट्या गोष्टी सांगत होता, जसे की जीवन आशाहीन आहे, तुमची काहीच किंमत नाही आणि तुमचे भविष्य अंधकारमय आहे, अशा गोष्टींवर विश्वास ठेवण्यास नकार द्या.

तुम्हाला हेच सांगण्यासाठी मी येथे आहे की तुमचे भविष्य उज्ज्वल आहे आणि तुम्हाला एक आशा आहे. मी कितीतरी लोकांना मदत मिळवताना आणि एक सुंदर जीवन जगताना पाहिले आहे!

आताच एका स्थानिक हॉटलाईन क्रमांकावर फोन करा (पृष्ठाच्या वरील बाजूस पाहा). जीवनात नव्याने सुरुवात करण्यासाठी कोणत्या गोष्टी मदत करू शकतात त्यांची एक सूची बनवा.

मी आशा करते की तुम्ही स्वतःला इजा पोहचवू नये हे मी तुम्हाला पटवून देऊ शकले आहे. कृपया मदतीसाठी कोणाशीतरी संपर्क करा किंवा या साईटवरील एखाद्या सल्लागाराशी संपर्क करा. तुमच्या पास्टरला (चर्चच्या मुख्य धर्मोपदेशकाला), सल्लागाराला, एखाद्या मित्राला, तुमच्या डॉक्टरला फोन करा. जीवनाच्या आणि आशेच्या दिशेने आताच पाऊल टाका.

“गिव्ह लाईफ अनादर चॉईस,” हा लेख लिनेट जे. हॉय यांनी लिहिलेला आहे.