गप्प राहून यातना सहन केली

मी फक्त सहा वर्षांची होते तेव्हा हे सुरू झालं. माझ्या वडिलांच्या कामामुळे आम्ही लिबिया देशात जाऊन राहू लागलो. पहिल्यांदा मी विमानानं प्रवास करत होते त्यामुळे मी खूप खूश होते. मी पहिल्यांदाच परदेशात जात होते कारण याआधी आमच्या कुटुंबातून कोणीही परदेशात गेला नव्हता. नवीन ठिकाणी जाऊन राहण्याविषयी आणि नवीन मैत्रिणी बनविण्याविषयी मी उत्साही होते.

पण, एक दिवस माझ्या सर्व आशा धुळीस मिळाल्या, कारण घरकाम करणाऱ्या एका माणसानं माझ्यावर लैंगिक अत्याचार केला. याविषयी कोणालाही माहीत झालं नाही. मदत मिळवण्याची माझ्यात हिंमत नव्हती. हा माणूस जिथं काम करायचा त्या घरी जायची मला भीती वाटू लागली. मला वाटायचं की मी मैत्रिणींसोबत असतानाही तो फक्त माझ्यावरच नजर ठेवतोय. भीतीमुळे मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून घ्यायचे. जेव्हा सर्व मोठे लोक घरी परत आले आहेत याची मला खात्री पटायची, तेव्हाच मी बाथरूममधून बाहेर यायचे. एक दिवस ही घटना सर्वांसमोर उघडकीस आली, आणि माझ्यावर अत्याचार करणाऱ्या माणसाला हद्दपार करून भारतात परत पाठवण्यात आलं.

मी कधीच विचार केला नव्हता की मोठे लोक लहान मुलांना नुकसान पोहचवू शकतात.

पण माझा त्रास इथंच संपला नाही. माझ्या कुटुंबाच्या अगदी जवळचे वेगवेगळे लोक पुढे आणखी सहा वर्षे माझ्यावर लैंगिक अत्याचार करत राहिले. मला कळत नव्हतं, की फक्त माझ्यासोबतच असं का घडत होतं. मी लाजाळू असल्यामुळे कदाचित असं घडत असावं का? की माझं कुटुंब श्रीमंत नसल्यामुळे असं घडत असावं? की माझे चुलतभाऊ मला नेहमी दमदाटी करायचे आणि धाक दाखवायचे त्यामुळे मी कमजोर आणि घाबरट बनली असावी का? मी कधीच विचार केला नव्हता की मोठे लोक लहान मुलांना नुकसान पोहचवू शकतात.

मला वाटायचं की चूक माझीच आहे—मी शापित आहे. मी कोणालाच सांगितलं नाही कारण मला लाज वाटत होती. माझं कुटुंब काय विचार करेल? मी नकाराचं जीवन जगायला सुरुवात केली; मी स्वतःला खात्री पटवून देण्याचा प्रयत्न करू लागले की जे घडलं त्याबद्दलचे विचार मी मनात येऊ दिले नाहीत तर माझ्यावरील लैंगिक अत्याचार थांबतील. पण, कितीही प्रयत्न करूनही, स्वतःला दोष देणं काही थांबत नव्हतं. मी विचार करायचे की या सर्वात मीच वाईट मुलगी आहे. अशा प्रकारचे दोषारोप करणारे विचार माझ्या जीवनाच्या इतर क्षेत्रांतही दिसू लागले. मी कोणतीही चांगली गोष्ट करू शकत नव्हते.

मी जसजशी मोठी होत होते, मी अजूनही ते विचार दाबण्याचा प्रयत्न करत होते आणि माझ्यासोबत जे घडलं ते अत्याचार होतं हे मानण्यासही मी तयार नव्हते. कदाचित मला ते आवडू लागलं होतं का? सामान्य जीवन जगण्याच्या उद्देशाने मी अत्याचाराच्या सर्व आठवणींकडे दुर्लक्ष करण्याचा खूप प्रयत्न केला होता. पण, मला जाणीव नव्हती की जे नुकसान व्हायचं होतं ते आधीच झालं होतं.

शेवटी, मी हार मानलं. मला माझ्या स्त्रीत्वाबद्दल घृणा वाटू लागली. मी पुरुषांप्रमाणे वागू लागली आणि आता मी कोणावरही विश्वास ठेवत नव्हते, खासकरून जवळच्या नातेवाइंकावर. मी वेडसरपणे वागू लागली, आणि नेहमी बचावात्मक पवित्रा घेऊ लागली.

मी आता 40 वर्षांची आहे, पण माझ्या आठवणी अजूनही जशाच्या तशा आहेत.

आता मला जाणीव होत आहे की भावना व्यक्त करायला त्या वेळी माझ्यासोबत कोणीच नव्हता. माझ्यावरील अत्याचारांबद्दल माझ्या आईवडिलांना कळलं तेव्हा त्यांनादेखील माहीत नव्हतं की काय करावं. ते असा विचार करून गप्प राहिले, की काळ माझ्या जखमा भरून काढेल किंवा जे घडलं होतं ते मी हळूहळू विसरून जाईन. त्या वेळी मला अशा एका मैत्रिणीची गरज होती जिच्यावर मी भरवसा करू शकले असते—एक अशी मैत्रीण जिच्यासमोर मी आपल्या भावना व्यक्त करू शकले असते, आणि जी मला खात्री देऊ शकली असती की जे घडलं त्यात माझी काहीच चूक नाही, आणि मी एकटी नाही. मला तशी मैत्रीण कधीच भेटली नाही.

मी आता 40 वर्षांची आहे, पण माझ्या आठवणी अजूनही जशाच्या तशा आहेत. अत्याचाराची प्रत्येक घटना मी अजूनही जशीच्या तशी आठवू शकते. आता जेव्हा माझी मुलं शाळेत किंवा बाहेर खेळायला जातात तेव्हा एक आई या नात्यानं मला खूप चिंता वाटू लागते. मी त्यांच्याशी लैंगिक अत्याचारांबद्दल बोललं आहे आणि सावध राहण्याविषयी त्यांना शिकवलं आहे. मागं वळून पाहिल्यास, मला जाणीव होते की जर मी अत्याचारांविषयी कोणालातरी सांगितलं असतं, मदत मिळवलं असतं, आणि स्वतःला दोष दिलं नसतं तर त्यामुळे मला कमी त्रास झाला असता आणि माझं बालपण सामान्य आणि सुखी-समाधानी असतं.

जर तुमच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला असेल, तर तुम्ही माझ्याप्रमाणे गप्प राहू नका. तुम्ही आठवणींना आणि वेदनांना दाबण्याचा प्रयत्न केला, तर त्या आठवणी तुमच्यावर वर्चस्व गाजवतील. तुम्हाला हा त्रास एकट्यानं सहन करण्याची गरज नाही. तुम्ही आमच्या गोपनीय आणि मोफत सल्लागारांपैकी एकाशी संपर्क करू शकता. ते सहानुभूतीनं तुमचं म्हणणं ऐकतील आणि तुमच्या पूर्णत्वाच्या प्रवासात तुम्हाला आधार देतील. जर तुम्ही तुमची माहिती खाली नमूद कराल, तर एखादा सल्लागार लवकरच तुमच्याशी संपर्क करेल. तुम्ही स्वतःच्या खऱ्या किंवा खोट्या नावाने माहिती देऊ शकता. ते तुमच्यावर अवलंबून आहे.

गोपनीयतेच्या कारणांमुळे लेखकाचे नाव बदलण्यात आले आहे.
छायाचित्र सौजन्याने PROHarsha K R

तुम्ही एकटेच प्रवास करण्याची गरज नाही. एखाद्या सल्लागाराशी बोला. हे गोपनीय आणि नेहमी मोफत आहे.

या समस्यांना सामोरे जाणे कठीण होऊ शकते. तुम्ही स्वतःला किंवा इतरांना इजा करण्याचा विचार करत असाल, तर कृपया हे वाचा!

कृपया खाली दिलेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती नमूद करा म्हणजे लवकरच आम्ही तुमच्याशी संपर्क करू.अन्यथा सूचित केले नसल्यास, सर्व रखाणे आवश्यक आहेत.

तुमचा लिंग::
वय श्रेणी (आवश्यक)::

तुमच्यासाठी एक योग्य सल्लागार नेमण्यासाठी आम्ही लिंग आणि वय विचारतो सेवेच्या अटी & गोपनीयता धोरण .