अविवाहित, एकाकी आणि गर्भवती
मी दारू पिणारी, असुरक्षित, किंवा कोणासोबतही लैंगिक संबंध ठेवणारी मुलगी नव्हते. पण, एका दुर्दैवी रात्री, एका चुकीच्या कृत्यामुळे माझं संपूर्ण जीवनच बदलून गेलं. ही आहे माझी कथा.
मी नुकतंच 21 व्या वर्षात पाऊल टाकलं होतं. माझ्या आईवडिलांनी एक पार्टी दिली होती आणि क्लबमध्ये जाण्याआधी सोबत वेळ घालवण्यासाठी मी माझ्या मित्र-मैत्रिनींना घरी बोलावलं होतं. आता मी प्रौढ बनले आणि मी माझे निर्णय स्वतः घेऊ शकते या विचारानं खूप उत्साही होते. माझ्या आनंदाचे आणखी एक कारण म्हणजे आमच्या कॉलेजच्या अंतिम परिक्षा संपल्या होत्या आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या.
पार्टी खूपच छान झाली होती. मी आणि माझ्या मित्र-मैत्रिनींनी सोबत चांगला वेळ घालवला होता. त्या वेळी आम्ही सर्वांनी मिळून कॉलेजपासून “स्वातंत्र्य” मिळण्याचा आणि भविष्याच्या योजनांचा आनंद साजरा करण्यासाठी काही दिवसांसाठी गोवा जाण्याची योजना आखली. गोव्यात सुरुवातीचे काही दिवस अतिशय मजेत गेले. प्रत्येक दिवशी, वेगवेगळ्या चौपाटीवर पार्टी असायची. एक संध्याकाळी, आम्ही मित्र-मैत्रिणींनी गोव्यातील एका लोकप्रिय नाईटक्लबमध्ये जायचं ठरवलं.
एका पाठोपाठ एक गोष्टी घडत गेल्या आणि आम्ही असुरक्षितपणे लैंगिक संबंध ठेवला
मोठ्या आवाजात संगित सुरू होता. वातावरण अगदी अद्भुत होतं, आणि मी खूप मजा करत होते. आणि त्या वेळी एक मित्र मला म्हणाला की आपण दोघं ग्रूपपासून वेगळं होऊ या आणि गोवा फिरून येऊ या. मी हो म्हटलं. आम्ही बाहेर फिरत असताना, त्याच्या मनात माझ्याप्रती प्रेमभावना असल्याचं त्यानं कबूल केलं. मग, एका पाठोपाठ एक गोष्टी घडत गेल्या आणि आम्ही असुरक्षितपणे लैंगिक संबंध ठेवला. त्या वेळी याबद्दल मी जास्त विचार केला नव्हता.
घरी परतल्यानंतर काही आठवड्यांनी, माझी मासिक पाळी चुकली असल्याची मला जाणीव झाली. मी घाबरून गेले, आणि मी एक प्रेग्नंसी किट घेऊन आली. ज्या दिवशी मी त्या प्रेग्नंसी किटवर गर्भधारणेची चाचणी सकारात्मक आल्याचं पाहिलं तेव्हा माझ्यावर जणू आभाळच कोसळलं. माझ्यासाठी हा जीवनातील सर्वात मोठा दुःस्वप्न होता.
मी गर्भवती असल्याचं मला कळलं तेव्हा मी अविवाहित, एकाकी आणि घाबरलेली होते. मला वाटलं मदतीसाठी माझ्याजवळ कोणीच नाही. माझी स्वतःची अपमानजनक स्थिती, लाज, स्वतःचा तिरस्कार, आणि स्वतःच्या नजरेत काही किंमत नसल्याची भावना, या सर्व गोष्टींचं ओझं माझ्या सहनशक्तीच्या बाहेरचं वाटत होतं. यात आणखी वाईट म्हणजे ज्याच्यासोबत मी असुरक्षित लैंगिक संबंध ठेवला होता त्यानं मला नकार दिला आणि मला कोणत्याही प्रकारे मदत करण्यास नकार दिला. हा माझ्यासाठी एक जोरदार दणका होता ज्याची मी मुळीच अपेक्षा केली नव्हती.
माझ्या मनात प्रकाशाच्या वेगानं विचार येऊ लागले. मी गर्भपात करून घ्यावा का? मी माझ्या आईवडिलांना सांगावं का? सांगितलं, तर ते माझ्याबद्दल काय विचार करतील? जर मी बाळाला जन्म दिला तर समाज काय म्हणेल? लोक माझ्याबद्दल काय विचार करतील? मी जितकं जास्त विचार करत होते, तितकं जास्त मी गोंधळून जात होते.
यात आणखी वाईट म्हणजे ज्याच्यासोबत मी असुरक्षित लैंगिक संबंध ठेवला होता त्यानं मला नकार दिला.
गर्भवती असल्याचं मी माझ्या आईवडिलांना सांगितलं नाही. त्याऐवजी, गर्भपात करणं चुकीचं आहे हे मला माहीत असूनही मी लगेच गर्भपात करायला जाण्यासाठी वेळ ठरवलं. जीवनात मला इतकं एकाकी कधीच वाटलं नव्हतं. मनात मी किंचाळत होते, “आता माझ्यावर कोण प्रेम करेल?”
गर्भपात करायला जाण्याआधीचे दिवस माझ्यासाठी अतिशय भीतीजनक होते. दोषभावना, नैराश्य आणि एकाकीपणा या गोष्टींनी माझ्या मनात गर्दी केली होती. मी जेवण करू शकत नव्हते किंवा झोपी जाऊ शकत नव्हते, आणि मी सर्वांना टाळत होते. मग, गर्भपातासाठी ठरवलेल्या दिवसाच्या आधीच्या सप्ताहांतात काहीतरी बदललं. मी त्याविषयी चांगल्या प्रकारे वर्णन करू शकत नाही, पण मला क्षमा आणि आशेचा एक छोटासा किरण जाणवला. एक महिन्यापेक्षा जास्त काळपर्यंत नैराश्य, उलथापालथ, आणि स्वतःची लाज वाटणं या गोष्टींमुळे त्रस्त असूनही पहिल्यांदा मला जाणवलं की कोणीतरी माझ्यावर प्रेम करतोय. मला जाणीव झाली की मला एकटीला याचा सामना करण्याची गरज नाही. मी याविषयी कोणालातरी सांगू शकते. कोणीतरी माझं म्हणणं नक्कीच ऐकून घेईल.
तो दिवस माझ्यासाठी खूप मोठा बदल घेऊन आला. मी गर्भवती आहे हे माझ्या आईवडिलांना सांगण्यासाठी मी धैर्य एकवटलं. मी गर्भवती आहे हे ऐकून सुरुवातीला त्यांना दुःख झालं, पण त्यांनी मला तुच्छ लेखलं नाही. आश्चर्य म्हणजे, त्यांनी मला कवेत घेतलं आणि बाळाला जन्म देण्याच्या माझ्या निर्णयाचं समर्थन केलं.
यामुळे येणाऱ्या वर्षांमध्ये मला जे धैर्य लागणार होतं ते मला मिळालं. आता माझी सुंदर मुलगी 4 वर्षांची आहे. देवाचीच कृपा म्हणावी लागेल मला एक चांगला माणूस भेटला आणि आम्ही दोघांनी आता लग्न केलं आहे. माझा पती माझ्या मुलीवर त्याच्या सख्या मुलीप्रमाणे प्रेम करतो.
तुम्ही अनियोजित गर्भधारणेच्या समस्येचा सामना करत आहात का? तुम्ही कदाचित आता निराशा आणि जाळ्यात सापडल्याच्या भावनांचा सामना करत असाल, पण तुम्ही एकटे नाही. जर तुम्ही खाली दिलेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती नमूद केली, तर आमच्यापैकी कोणीतरी एक जण तुमची कथा ऐकण्यासाठी आणि तुम्हाला मदत करण्यासाठी आणि एक आशा देण्यासाठी तुमच्याशी संपर्क करेल.
गोपनीयतेच्या कारणांमुळे लेखकाचे संक्षिप्त नाव वापरण्यात आले आहे.
तुम्ही एकटेच प्रवास करण्याची गरज नाही. एखाद्या सल्लागाराशी बोला. हे गोपनीय आणि नेहमी मोफत आहे.
या समस्यांना सामोरे जाणे कठीण होऊ शकते. तुम्ही स्वतःला किंवा इतरांना इजा करण्याचा विचार करत असाल, तर कृपया हे वाचा!
कृपया खाली दिलेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती नमूद करा म्हणजे लवकरच आम्ही तुमच्याशी संपर्क करू.अन्यथा सूचित केले नसल्यास, सर्व रखाणे आवश्यक आहेत.